मिस्टर गे इंडिया आणि मिस्ट एलजीबीटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘मिस्टर गे इंडिया’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोल्हापूरच्या विशाल पिंजानी याने मोहोर उमटवली. काल पुण्यात झालेल्या रंगारंग सोहळ्यात ही निवड झाली.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी आता तो भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. कोल्हापूर आणि परिसरात ‘एलजीबीटीक्युआयएप्लस” समुदायासाठी ‘अभिमान’ या स्वयंसहाय्यता गटाद्वारे विशाल काम करतो.
अंतिम सोहळ्यात समलिंगी पुरुषांच्या सामाजिक – सांस्कृतिक संघर्षाला सामोरे जात आत्मविश्वासपूर्वक घडवलेल्या व्यक्तिमत्त्वाचे मोहक रूप, सहानुभाव, सर्वसमावेशकता याचे अनोखे दर्शन त्याने घडवले. समलिंगी पुरुषांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत शारीरिक तंदुरुस्ती, रुबाबदार व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा यासोबतच एलजीबीटीक्युआयएप्लस समुदायासाठी केलेले सामाजिक कार्य हे निवडीचे निकष होते.
परीक्षकांचे गुण आणि स्पर्धकाला आयोजकांच्या वेबसाईटद्वारे लोकांनी दिलेली मते विचारात घेऊन अंतिम निकाल दिला गेला. राजपिपळा संस्थानाचे राजपुत्र आणि स्वतः समलिंगी असल्याचे जाहीरपणे मान्य करणारे मानवेंद्र सिंह गोहिल यांच्या हस्ते विशालला ‘मिस्टर गे इंडिया’चा किताब प्रदान करण्यात आला.