पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी बॉक्ससेल (कमान) पूल बांधण्यात येणार आहे. त्याची पायाभरणी तसेच रस्ता काँक्रिटीकरणाचा प्रारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते झाला.आमदार आवाडे यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून या कामासाठी ५ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे.
इचलकरंजी येथे नदीवेस नाका ते पंचगंगा नदीदरम्यान पूर्वी कमान असलेला पूल होता. रस्ता रुंदीकरणावेळी तो पाडला. तेथे मोठे नळ टाकून पाणी जाण्यासाठी सुविधा करण्यात आली; मात्र पावसाळ्यात नळामधून आवश्यक प्रमाणात पाणी जात नसल्याने पूरस्थिती गंभीर बनत होती. त्यामुळे येथे पूर्ववत कमान पूल बांधावा, अशी मागणी होत होती.
राज्य शासनाने जुलै २०२२ च्या अर्थसंकल्पात बॉक्ससेल बांधण्यासाठी ५.७४ कोटींचा तसेच नदीवेस नाका ते पंचगंगा नदी रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी ४.१० कोटींचा निधी मंजूर केला. त्यानुसार या दोन्ही कामांचा प्रारंभ आमदार आवाडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, सर्जेराव पाटील, अहमद मुजावर आदी उपस्थित होते.