मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर!

हातकणंगले मतदारसंघांत ७ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी एमआयडीसी, पॉवरलूम, प्रोसेसिंग, पेट्रोल पंप, मेडिकल, बांधकाम, हॉटेल, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने आदी क्षेत्रांतील कामगारांना पगारी सुटी जाहीर केली आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या कार्यकक्षेत शिरोळ व हातकणंगले या दोन तालुक्यांचा समावेश आहे.

तसेच शहर व आसपासच्या परिसरात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी येथे कामगारांची संख्या लक्षणीय आहे. आस्थापनांनी लोकसभा निवडणुकीदिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी द्यावी. सुटी ही साप्ताहिक सुटी रद्द करून देऊ नये. याबाबत ज्या आस्थापना कर्मचाऱ्यांना सुटी अथवा सवलत देत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
सर्व आस्थापना, कारखाने, दुकानदारांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी केले आहे