प्रशासनाच्या समन्वय अभावाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जुना चंदूर रोडवरील, मगदूम नगर, सुरज गॅस गोडावून समोरील रस्त्यावरील गटारीचे सांडपाणी वारंवार नागरिकांच्या घरामध्ये व जागेत पसरत आहे. या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेत नसल्याने येथील नागरीक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
जुना चंदूर रोड, सुरज गॅस गोडावून समोर मगदूम नगर या परिसरातील रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. सदर रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने सदर रस्त्याचे डांबरीकरण करणेत येत आहे. सदर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. तर गटारीचेही काम सुरू आहे.. मात्र, गटारीची लेवल चुकीच्या पध्दतीने झाल्यामुळे गटारीतील सांडपाणी कायमपणे परिसरातील मोकळ्या जागेत तसेच त्याठिकाणी सुरू असलेल्या बांधकामामध्ये पसरून दुर्गंधी सुटत आहे.परिसरातील जागा मालक स्वखर्चाने सांडपाणी काढतात.
याबाबत वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेचे आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळेवर सदरची गटार ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात सांडपाणी, कचरा परिसरात पसरले त्याठिकाणी बांधकाम सुरू असून गटारीचे सांडपाणी पसरल्याने मोठे नुकसान झाले. तेव्हा याबाबत तातडीने आयुक्त पल्लवी पाटील यांनी लक्ष देवून गटारीचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.