४५० रुपयांत सिलेंडर…..

राजस्थान सरकारने आज विधानसभेमध्ये आपला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्य सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री दीया कुमारी यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी दीया कुमारी यांनी विविध कल्याणकारी योजनांसह विकास कार्यांचीही घोषणा केली आहे.

सुमारे २२ वर्षांनंतर राजस्थानच्या विधानसभेत स्वतंत्र वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. याआधी मुख्यमंत्रीच अर्थसंकल्प सादर करत असत. दरम्यान, आज दीया कुमारी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये महिला आणि तरुणींसाठी काही विशेष योजनांचाही समावेश आहे.राजस्थानच्या वित्तमंत्री दीया कुमारी यांनी अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान मातृ वंदना योजनेमधून गर्भवती महिलांसाठी ६ हजार ५०० रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. त्याबरोबरच राज्यातील गरीब महिलांना ४५० रुपयांमध्ये एलपीजी सिलेंडर देण्याची घोषणा केली. या घोषणेचा लाभ राज्यामधील सुमारे ७३ लाख कुटुंबांना होणार आहे. त्याशिवाय सरकारने अर्थसंकल्पामधून लाडली सुरक्षा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची घोषणाही करण्यात आली आहे. तसेच मुलींना सेल्फ डिफेन्स स्कीमसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.