ग्रामसभेत अनोखा ठराव….

आगामी काळात येणाऱ्या लोकसभा व विधानसभेसह सर्व सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर घ्या, असा ठराव आटपाडी तालुक्यातील शेटफळेच्या ग्रामसभेत घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी जोरदारपणे ईव्हीएमला विरोध नोंदविला.

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गायकवाड होत्या.शेटफळे येथील बाजार पटांगणात ग्रामसभा मंगळवारी झाली. यावेळी माजी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, प्रा. सी. पी. गायकवाड, उपसरपंच ज्ञानेश्वर वाघमारे, माजी उपसरपंच विजय देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामसेवक आर. एम. कोळी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. यावेळी आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.ग्रामसभेत ग्रामस्थांनी येणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्याचा ठराव मांडला. त्यास एकमताने पाठिंबा देत मंजुरी देण्यात आली.

तसेच राज्यातील मराठा कुणबी समाजाला आरक्षण देण्याचा व त्याच्या नोंदी शोधण्याचे काम केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.