सध्या मराठा आरक्षण खूपच जोर खात आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज बीड, श्रीगोंदा भागाचा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सगे सोयऱ्यांच्या कायद्याबाबत सरकारची स्पष्ट भूमिका नसल्याने आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला.
“सग्या सोयऱ्यांच्या कायद्याबाबत सरकारची स्पष्ट भूमिका नसल्याने उद्यापासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. सरकारकडून होणारा दगा फटका समाजाला परवडणार नाही म्हणून आपण आमरण उपोषण करतोय असंही जरांगे यांनी स्पष्ट केले. या उपोषणाआधी अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे मराठा समाजाची बैठक होईल. त्यानंतर १० वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरूवात होईल. या वेळच्या आमरण उपोषषणात आपण औषधोपचार, पाणी घेणार नसल्याचेही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ(Chhagan Bhujbal) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. “मला चॅलेंज देऊ नको, गप्प बस, पाटील असल्यानेच ओबीसीत घुसून दाखवलं, गोर गरिबांचे वाटोळ करु नका, मला करायचे नाही. नाईलाजाने मला चॅलेंज करावे लागेल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.