राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.
नरेंद्र खेडेकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. दरम्यान, उद्धव ठाकरे हे २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी याबाबत घोषणा केली जाऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे असणार आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात असलेले प्रतापराव जाधव हे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे उभे राहतील, असं बोललं जात आहे.