Maharashtra Election: निवडणूक तारखांची घोषणा दसऱ्यानंतर? महाराष्ट्र, झारखंडसाठी हालचाली सुरु

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची प्रक्रिया वेगवान झाली असून दसऱ्यानंतरच्या रविवारपासून (१३ ऑक्टोबर) कोणत्याही क्षणी राज्यातील मतदानाचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. त्याच वेळी झारखंडमधील निवडणुकीचीही घोषणा होऊ शकते. दुसरीकडे भाजपची राज्यातील पहिली यादी येत्या आठवडाभरात जाहीर होईल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. हरियाणा निकाल जाहीर झाल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र व झारखंडच्या निवडणूक तारखांच्या घोषणेच्या प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्या आहेत.

आयोगाने दोन्ही राज्यांचा दौरा नुकताच पूर्ण करून संबंधितांची मते जाणून घेतली होती. महाराष्ट्रात किमान तीन टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात.भाजपनेही आपल्या उमेदवार याद्या लवकरात लवकर निश्चित करण्याचे ठरविले आहे. राज्यात भाजप किमान १६०-१७० जागा लढवेल. सूत्रांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर राज्यातील इतर उमेदवार जाहीर करण्यास भाजपने तुलनेने वेळ घेतला, त्याचाही फटका पक्षाला बसल्याचे राज्य भाजपच्या नेतृत्वाने पक्षनेतृत्वाच्या कानावर घातले आहे.

याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विधानसभेसाठीचे उमेदवार लवकर जाहीर करण्याची पक्षाची रणनीती आहे. नजिकच्या काळात यासाठी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकांचा धडाका सुरू होऊन भाजपचे बहुतांश उमेदवार दिवाळीपूर्वीच जाहीर होतील, अशी चिन्हे आहेत.