रतन टाटांचं आणखी एक स्वप्न पूर्ण…

देशातील बड्या उद्योगपतींपैकी एक नाव म्हणजे रतन टाटा टाटा समूह सातत्याने समाज कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी कामं केली जातात. असंच एक समाजउपयोगी काम रतन टाटा यांनी केलं आहे. रतन टाटा यांनी 165 कोटी रुपये खर्च करून प्राण्यांसाठी रुग्णालय (Animal Hospital) बांधलं आहे. हे रुग्णालय रतन टाटांना नेमकं का बांधावे असं वाटलं? यामगची नेमकी स्टोरी काय? पाहुयात सविस्तर माहिती. 

देशातील लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांनी त्यांचा आणखी एक आवडता प्रकल्प पूर्ण केला आहे. टाटा समूह सातत्याने समाज कल्याणासाठी विविध योजना राबवत असतो. त्यांच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलने कोट्यवधी लोकांना अत्यंत कमी खर्चात कर्करोगाशी लढण्यास मदत केली आहे. त्याच धर्तीवर आता रतन टाटा 165 कोटी रुपये खर्च करून 2.2 एकर जागेवर 24 तास चालणारे प्राणी रुग्णालय सुरू करणार आहेत. मुंबईत तयार झालेले हे हॉस्पिटल सर्वांच्या मदतीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होणार आहे.

86 वर्षांचे रतन टाटा अनेक प्रकारच्या देणग्यांसाठी ओळखले जातात. टाटा ट्रस्टचे स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल महालक्ष्मी परिसरात सुरू होणार आहे. कुत्रा, मांजर, ससा यासारख्या लहान प्राण्यांची सेवा करण्यासाठी हे डिझाइन केले आहे. प्राणी देखील कुटुंबाचा भाग असल्याचे मत रतन टाटा यांनी व्यक्त केले. माझ्याकडे अनेक पाळीव प्राणी देखील आहेत. त्यामुळं मला या रुग्णालयाची नितांत गरज भासली. आता माझे स्वप्न पूर्ण होताना पाहून मला खूप आनंद होत असल्याचे रतन टाटा म्हणाले.