सध्या चोरीच्या घटनात खूपच वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी फसवाफसवीच्या घटनात वाढच होत चालली आहे. कासेगाव (ता. वाळवा) येथील कापड दुकानातून साड्यांची चोरी केल्याप्रकरणी चार महिलांना दोषी धरून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. जी. वाघ यांनी चौघींना प्रत्येकी एक महिना सश्रम कारावास आणि प्रत्येकी १ हजार
रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुरेखा दिलीप कांबळे (वय ३५), सगुणा मारुती कांबळे (४५), सिंधू प्रकाश कांबळे (३२), लता भागवत जावळे (३८, सर्व रा. किल्लारी, जि. लातूर) अशी शिक्षा झालेल्या महिलांची नावे आहेत.
याबाबत हेमलता जालिंदर माने (रा. कासेगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. ७ फेब्रुवारी २०१० रोजी या चौघी हेमलता माने या काम करत असलेल्या कापड दुकानात कपडे खरेदीस आल्या होत्या. त्यावेळी चौघींनी ४ साड्या चोरल्या होत्या. ही बाब माने यांच्या लक्षात येताच त्यांनी चौघींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. हवालदार जे. ए. चव्हाण यांनी तपास केला. या खटल्याची सुनावणी न्या. वाघ यांच्यासमोर झाली. सरकारी वकील भैरवी स्वप्नील मोरे यांनी ६ साक्षीदार तपासले.