विराट कोहली इंग्लंड सीरीजच्या सामन्यांमधूनही …

टीम इंडिया आणि  इंग्लंड यांच्यातील उर्वरित कसोटी सामन्यांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या संघात टीम इंडियाचे दिग्गज रवींद्र जाडेजा  आणि केएल राहुल या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, टीम इंडियाचं रनमशीन असणारा विराट कोहली मात्र, या तिन्ही सामन्यांत खेळणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तिनही सामन्यांमधून विराट कोहली बाहेर असणार आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, टीम सिलेक्शनमधील सर्वात मोठी अपडेट म्हणजे, पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच उर्वरित तीन सामन्यांमध्येही विराट कोहली खेळताना दिसणार नाही.  वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली उर्वरित सामन्यांसाठी निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीनं शुक्रवारी बीसीसीआयला याबाबत माहिती दिली. याच दिवशी निवड समितीची राजकोट, रांची आणि धर्मशाळामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी एक ऑनलाईन मिटिंग पार पडली होती. 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या सुरुवातीला कोहलीनं भारतीय कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली होती. तेव्हा तो म्हणाला होता की, देशाचं प्रतिनिधित्व करणं, हे नेहमीच आपलं सर्वोच्च प्राधान्य आहे, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे विराट इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळू शकणार नाही. यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही विराटच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. जय शाह म्हणाले होते की, बीसीसीआय त्यांच्या निर्णयाचा आदर करते आणि बोर्ड आणि संघ व्यवस्थापनानं त्यांना पाठिंबा दिला आहे.