उजनीतून सोडलेले उजव्या कालव्याचे पाणी बंद..

उजनी धरणातील पाणीसाठा सध्या उणे ११ टक्क्यांपर्यंत आला असून, धरणातील मृतसाठा ५८ टीएमसी आहे. मृतसाठ्यात अंदाजे १८ टीएमसी गाळ असून, उर्वरित ४० टीएमसी पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरवायचे आहे.त्यामुळे शेतीसाठी सोडलेले उजव्या कालव्याचे पाणी गुरुवारी (ता. ८) बंद करण्यात आले आहे.जिल्ह्यात यंदा दुष्काळी स्थिती असून माढा, बार्शी, करमाळा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांत यापूर्वीच दुष्काळ जाहीर झाला आहे.

उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती आहे. भूजल सर्वेक्षणानुसार जमिनीची पाणीपातळी एक मीटरने खालावली असून, यंदा काही तालुक्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.संभाव्य पाणी संकटाचा अंदाज घेऊन मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावात पुढील तीन दिवस पाणी सोडले जाणार आहे. सध्या या तलावात ३० टक्के पाणी आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत उजनीतून सोडलेले डाव्या कालव्याचेही पाणी पूर्णत: बंद केले जाणार आहे.

आता शेतकऱ्यांना पावसाळ्यापर्यंत उजनीतून पाणी मिळणार नाही.सोलापूर, धाराशिव, कर्जत-जामखेड, बारामती, इंदापूर या शहरांसह एमआयडीसी व सोलापूर जिल्ह्यातील १०० हून अधिक गावांचा पाणीपुरवठा उजनीवर अवलंबून आहे. धरणातील पाणी आता पिण्यासाठीच राखीव असणार आहे