पंढरपूर, पंढरपूर शहरात कार्तिक यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून वारकरी भाविक वारी पोहोच करण्यासाठी येत असतात. यामध्ये सुमारे आठ ते दहा लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमीतकमी वेळेत सुलभ दर्शन होणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. कार्तिक यात्रा सोहळ्याबाबत माध्यमांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, अवकाळी व अतिवृष्टीमुळे पंढरपूर शहरातील महत्वाच्या रस्त्यांसह अनेक रस्त्यांवर खड्डे पडून रस्ते नादुरुस्त झाले आहेत. असे नादुरुस्त झालेलेसर्व रस्ते दोन दिवसात पुन्हा व्यवस्थित केले जाईल. रस्त्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे काम पूर्ण होणार आहे.
शहरातील महत्वाच्या मार्गावर असलेल्या अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना अतिक्रमण काढण्याबाबत सूचना करण्यात
आल्या.
व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद राहणार…..
भाविकांची संख्या व विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला लागणारा कालावधी लक्षात घेता व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना मंदिर समिती प्रशासनास केल्या असून कोणीही इतर मार्गाने कोणालाही दर्शन देण्यासाठी प्रयत्न करू नये. दर्शनबारीमध्ये थांबलेल्या भाविकांचा विचार करावा, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.
