ना पंचनामा, ना पोस्टमार्टम; रस्ते अपघातातील मृतदेह थेट नदीत फेकून दिला पोलिसांनी!

 बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये पोलिसांची असंवेदनशीलता दिसून आली आहे. जिल्ह्यातील हाजीपूर मुजफ्फरपूर रोडवर एक अपघात झाला होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृत व्यक्तीचे पार्थिक हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी त्याला नदीमध्ये फेकून दिले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस अधिकारी राकेश कुमार यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.ट्रकची धडक बसल्याने व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ट्रक चालक घटनास्थळावरुन पळून गेला. व्यक्तीचा मृतदेह त्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला नाही, तर त्याला पुलावरुन खाली पाण्यात फेकण्यात आले.

पोलिस मृतदेह पाण्यात फेकत असताना काही लोकांनी याचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेहनंतर पाण्यातून बाहेर काढला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

पोलिस अधिकारी राकेश कुमार यांनी सदर घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, पोलिस स्टेशनमध्ये एका दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. काही अवयव रस्त्यावर पडले होते. ते नदीच्या प्रवाहात सोडण्यात आले.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की पोलिस कर्मचारी मृतदेह पाण्यात फेकत आहेत. मृतदेहाची पूर्ण चाळणी झालेली होती आणि कपडे फाटलेले होते. पुलाच्या कठड्यावर मृतदेह ठेवला जातो. त्यानंतर काठीच्या साहाय्याने मृतदेह नदीमध्ये फेकण्यात येतो. विशेष म्हणजे यावेळी अनेक वाहनं रस्त्यावरुन ये-जा करत असतात.