गेल्या काही दिवसांपासून शहरासह परिसरात चोरीचे प्रकार वाढले आहेत. शनिवारी दुपारी भरवस्तीत घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड लांबवल्याने इस्लामपुरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी शहरात श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. मात्र, काही अंतरावर जाऊन श्वान घुटमळले. सांगली पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक रविवारी इस्लामपुरात तळ ठोकून होते.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. अजून पोलिसांना धागेदोरे सापडले नाहीत. इस्लामपूर येथील टकलाईनगर परिसरातील घरफोडीच्या प्रकाराचा पोलिस कसून तपास करत आहेत. रविवारी सकाळी ठसेतज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरील ठसे घेतले. त्याचा अहवाल दोन दिवसात येणार आहे.
पथकाने कापूसखेड नाका, जावडेकर चौक, तिरंगा चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. रेकॉर्डवरील चोरट्यांचे मोबाईल लोकेशन तपासले जात आहे. भरवस्तीत दिवसा घडलेल्या घरफोडीने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांत संताप आहे.