उद्या विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा!

पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणी याचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध १ म्हणजेच दि. १० ते माघ शुद्ध ५ दि. १४ फेब्रुवारी या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

बुधवार, दि. १४ रोजी दुपारी १२ वाजता वर्हाडी मंडळींच्या उपस्थितीत शाही विवाह सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळ्यानिमित्ताने मंदिरात श्री विठ्ठल सभामंडप येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत श्रीमद् भागवताचार्य साध्वी अनुराधा दीदी यांचे श्री रुक्मिणी स्वयंवर कथेचे निरूपण सुरू आहे. बुधवार, दि. १४ रोजी वसंत पंचमी दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. यानिमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.