राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या वतीने हातावरील पोट असलेल्या गरजूंना दररोज पोटभर अन्न मिळावे, या हेतूने शिवभोजन थाळी केंद्रे सुरू करण्यात आली. राज्यात सध्या दुष्काळी स्थिती असून राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, माढा, करमाळा व सांगोला या तालुक्यांचा समावेश आहे. या पाच दुष्काळी तालुक्यांपैकी केवळ माळशिरस या एकाच तालुक्यात एकमेव शिवभोजन थाळी केंद्र सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ५० लाखांवर पोचली असून, त्यात निराधारांची संख्या लक्षणीय आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणीही भूकबळीचा शिकार होऊ नये, म्हणून गरजेच्या ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्रांची गरज आहे. पण, जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी केवळ चार तालुक्यातच शिवभोजन थाळी सुरू आहेत. उत्तर सोलापूर, बार्शी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ व माढा या सात तालुक्यांमध्ये विशेषत: दुष्काळ जाहीर झालेल्या चार तालुक्यांमध्ये एकही केंद्र नाही.