‘शिवरायांचा छावा’ने रिलीजच्या पहिल्या दिवशीच …

शिवरायांचा छावा’ हा सिनेमा 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 0.5 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी आतापर्यंत या सिनेमाने 0.15 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 0.65 कोटींचा गल्ला जमवला आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे. आता हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला ।। या दोन ओळींतच खर्‍या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो. छत्रपती संभाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी मृत्यूलाही ज्यांच्यासमोर ओशाळावं लागलं त्या हिमालयाएवढं कर्तुत्व असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मनोमन नमन केलं जातं, अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती अणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य रक्षणार्थ अनंत अत्याचार सोसत बलिदान देणाऱ्या या हिंदवी स्वराज्याच्या वाघाचा पराक्रमी इतिहास उलगडणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट 16 फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल झाला आहे.    

स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाची  संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. आलेल्या संकटांवर पाय रोऊन उभे राहत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार केला.