पहिल्याच चेंडूवर जेम्स अँडरसनला दाखवला तंबूचा रस्ता

तिसऱ्या कसोटी सामन्याच्च्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जबरदस्त कामगिरी केली होती. बेझबॉल रणनितीने भारतीय गोलंदाजांची पिसं काढली होती. 2 बाद 207 असा पल्ला गाठला होता. त्यामुळे भारताने केलेल्या 445 धावांचा पल्ला सहज गाठेल असं वाटत होतं. पण तिसऱ्या दिवशी सर्व फासे उलटे पडले. 112 धावांवर 8 गडी बाद झाले. तर इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 319 धावा करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी राहिली. पहिल्या डावात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीची जादू दिसली. चार खेळाडूंना बाद करत टीम इंडियाला कमबॅक करून दिलं. त्यामुळे मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीचं कौतुक होत आहे. चार पैकी दोन जणांचा त्रिफळा सिराजने उडवला. परफेक्ट यॉर्करचं दर्शन त्याने घडवलं. रेहान अहमद आणि जेम्स अँडरसन यांना क्लिन बोल्ड करत तंबूचा रस्ता दाखवला. मोहम्मद सिराजने 21.1 षटक टाकली. त्यात 2 षटकं निर्धाव टाकली. 84 धावा देत दोन गडी बाद केले.

कर्णधार रोहित शर्मा याने 70 वं षटक मोहम्मद सिराजच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रेहान अहमदच्या बरोबर बुंद्यात चेंडू टाकला. त्यामुळे त्याला कसा शॉट खेळावा हे कळलंच नाही. काही कळायच्या आतच त्याचा त्रिफळा उडाला होता. रेहान अहमदने 13 चेंडूत 6 धावा केल्या. त्यानंतर 72 व्या षटकात समोर जेम्स अँडरसन आला. मग काय त्याच्यासमोरही यॉर्कर अस्त्र काढलं. पहिल्याच चेंडूवर जेम्स अँडरसनला बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. यॉर्करपुढे जेम्स अँडरसनचं काहीच चाललं नाही. त्यामुळे त्याला एका धावेवर समाधान मानून परतावं लागलं.