पश्चिम महाराष्ट्रतील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा. राष्ट्रवादीकडून तीन वेळा खासदार राहिलेल्या उदयनराजेंनी निवडून आल्यानंतर केवळ चारच महिन्यात राजीनामा दिला आणि 2019 साली भाजपकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटीलयांनी त्यांचा पराभव केला. जिवलग मित्रासाठी शरद पवारांनी मुसळधार पावसातही सभा घेतली आणि सातारकरांनीही त्यांना धो धो पावसासारखी भरभरून मतं दिली. साताऱ्याच्या या निवडणुकीमुळेच शरद पवारांबद्दल एक सहानुभूतीची लाट आली आणि भाजपच्या एकहाती सत्ता मिळवण्याच्या महत्वाकांक्षेवर पाणी फेरलं गेलं. 2024 सालच्या निवडणुकीतही पुन्हा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपचे उदयनराजे अशीच लढत रंगणार असल्याचे चित्र आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये भाजपचा एक आमदार, शिवसेना शिंदे गटाचे दोन, काँग्रेसचा एक, अजित पवार आणि शरद पवार गटाचा प्रत्येकी एक असे आमदार आहेत.
- सातारा जावळी – शिवेंद्रराजे, भाजप
- कोरेगाव – महेश शिंदे, शिवसेना शिंदे गट
- कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी शरद पवार
- कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
- पाटण -शंभुराज देसाई, शिवसेना शिंदे गट
- वाई – मकरंद पाटील, राष्ट्रवादी अजित पवार