तासगाव-कवठेमहांकाळला ‘घड्याळा’साठी फिल्डींग

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाल्यानंतर तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघातील घड्याळ चिन्ह सद्यस्थितीत तरी पोरके आहे.है ‘घड्याळ हातात बांधून विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. प्रताप पाटील यांचे नाव सध्या चर्चेत आहे. ‘नरो वा कुंजरोवा भूमिकेत असलेले माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघावर घड्याळाचा गजर होत राहिला आहे. मात्र आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेले आहे. सद्यस्थितीत या मतदारसंघात मोजकेच कार्यकर्ते अजित पवार गटाकडे आहेत. मात्र, महायुतीच्या फॉर्म्युल्यात ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याच्या चर्चा आहे. अशा परिस्थितीत मतदारसंघात पोरके झालेले घड्याळ हातात बांधण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.