आजपासून बारावी परीक्षेला सुरुवात झालेली आहे. बारावीनंतर दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. यावरुन पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही वेगवेगळी मतमतांतरं पाहायला मिळत आहेत. अशातच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 2025-25 च्या शैक्षणिक सत्रापासून (Academic Session) विद्यार्थी वर्षातून दोनदा परीक्षा देऊ शकतील त्यादृष्टीनं तयारी सुरू आहे असं वक्तव्य केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी सांगितलं की, विद्यार्थ्यांना 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांना दोनदा बसण्याचा पर्याय असेल. छत्तीसगडमध्ये ‘पीएम श्री’ (प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया) योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रधान बोलत होते.
या योजनेंतर्गत राज्यातील 211 शाळा श्रेणीसुधारित करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत केंद्राच्या योजनेबाबत बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान म्हणाले की, 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत दोनदा बसण्याची संधी मिळेल. ते म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवणं, त्यांना गुणवत्तेनं समृद्ध करणं, त्यांना संस्कृतीशी जोडून ठेवणं आणि त्यांना भविष्यासाठी तयार करणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय असून भारताला विकसित देश बनविण्याचं हेच सूत्र आहे. तसेच, 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं हेच सूत्र आहे.