हातकणंगले लोकसभा म्हणजेच पूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा कृष्णा पंचगंगेचा ऊसपट्टा या मतदारसंघाचा प्रमुख भाग.अनेक वर्ष कॉंग्रेस अन् पुढे राष्ट्रवादीने या मतदारसंघावर राज्य केलं. विशेषतः बाळासाहेब माने, त्यांची सून निवेदिता आणि आता त्यांचे नातू धैर्यशील माने. या माने घराण्याने हातकणंगले लोकसभा वेळोवेळी जिंकली.
2009 साली राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून येथून दणदणीत विजय मिळवला.पुढे 2014 च्या निवडणूक जागावाटपात ‘राष्ट्रवादी’ने हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला दिला. त्याही वेळी शेट्टी यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखली. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली. त्याचा फटका थेट सरकारलादेखील बसला होता.त्याविरोधात धैर्यशील माने हे शेतकरी, तरुण, व्यापारी आणि उद्योजक यांचे मुद्दे घेऊन या रिंगणात उतरले.
राजू शेट्टी यांना इचलकरंजीचा पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा विकास या मुद्द्यावर मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न केल्याने माने यांना शहरात लोकप्रियता मिळत गेली. शिवाय सेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी प्रचाराची राळ उठवली.त्याला भाजपचे पाठबळ आणि मराठा मोर्चाची पार्श्वभूमी लाभल्याने धैर्यशील माने यांनी मैदान मारले.
सध्याचं चित्र पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात विद्यमान खासदार धैर्यशील माने लढत देणार हे उघड आहे. त्यांच्या बरोबरीनेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील, भाजपाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, शाहूवाडी तालुक्यातून काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड अशी मात्तबर नावं उमेदवारीसाठी पुढे येत आहेत.