अलीकडच्या काळात अत्याचाराच्या घटनांत खूपच वाढ झालेली पहायला मिळत आहे. असाच एक अतिप्रसंगाचा प्रकार इस्लामपुरात उघडकीस आला आहे. इस्लामपूर येथे पती, मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी आनंदा नेताजी वडार (वय ३४) या संशयिताला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.
हा बलात्काराचा प्रकार अडीच वर्षांपासून सुरू होता. सप्टेंबर २०२१ मध्ये पीडिता घरात एकटीच असताना आनंदा हा तिच्या घरी गेला. कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आनंदा याने पती, मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन पीडितेवर वारंवार बलात्कार केला.
पीडिता घरासमोर भांडी घासत होती. त्यावेळी आनंदा याने तिचा विनयभंग केला. पीडितेचा नवरा, सासू आनंदा याला अडवत असता त्याने शिवीगाळ केली. आनंदाची बायको, भावजय यांनी पीडितेचा पती, सासू यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याबरोबर आलेले अभय वडार, धीरज वडार यांनीही पीडितेच्या पतीला मारहाण केली. संशयितांनी चार तोळ्याचे दागिने काढून घेतले. कोठे जाऊन तक्रार करायची तेथे करा, असे म्हणून पुन्हा मारहाण करणेची धमकी दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आनंदा याला अटक केली आहे. त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.