विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत ज्या पक्षाने जी जागा जिंकली, त्याच पक्षाला ती जागा दिली जाईल, असे सर्वसाधारण सूत्र दोन्ही आघाडीत निश्चित झाले आहे. तरीही महायुती आणि महाविकास आघाडीत असलेले पक्ष आणि प्रत्येक पक्षातून असणारे इच्छुक यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ जागेवरून स्पर्धा सुरू आहे.महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आणि महायुतीत जागा कोणाला जाणार, यावरूनच अनिश्चिततेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत हा तिढा होणार असून, त्यातून उमेदवारासाठीच घमासान होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महायुतीला हादरा आणि महाविकास आघाडीला फुटीरवाद्याचा धोका अधिक गडद झाला आहे.जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
आपापसात सुरू असलेल्या तिढ्यामुळे ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे पुढे अद्याप सुटलेलं नाही. इचलकरंजी, राधानगरी, चंदगड, हातकणंगले व शिरोळच्या जागेवर महाविकास आणि महायुतीतही जागा वाटपाचा पेच निर्माण झाला आहे.महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आमदार डॉ. विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने शाहूवाडीसह करवीर, चंदगड, व हातकणंगले मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. करवीर मतदारसंघातून त्यांनी संताजी घोरपडे यांच्या नावाला पसंती दिली आहे. पण या मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे महायुतीतून इच्छुक आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून कोरे यांच्या जवळ गतवेळचे उमेदवार अशोकराव माने आहेत. पण भाजपने या जागेवर दावा केला आहे.
शिवाय शिवसेना शिंदे गट एका माजी आमदाराला या ठिकाणाहून उतरवण्याची तयारी करत आहे. महाविकास आघाडीकडे विद्यमान आमदार राजू बाबा आवळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पण शिवसेना ठाकरे गटाचे सुजित मिंचेकर हे देखील इच्छुक आहेत शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजीव आवळे यांनी देखील तयारी सुरू केली आहे.