आता घरबसल्या मतदान करता येणार….

वयोमान, आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून  80  वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी ‘घरातून मतदान’ या विशेष उपक्रमाद्वारे घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

देशपांडे म्हणाले, अनेकदा ज्येष्ठ नागरिकांचे वयोमान, त्यांचे आजारपण या कारणांमुळे त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नाही. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावे यासाठी हा उपक्रम निवडणूक आयोगातर्फे प्राधान्याने राबविण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये चिन्हांकित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 12 -डि क्रमांकाचा अर्ज पुरविण्यात येणार असून तो भरुन निवडणूक घोषित झाल्यानंतर पाच दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे.

जिल्हाधिकारी या मागणीवर अंतिम निर्णय घेणार असून त्यानंतर प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबधित मतदाराच्या घरी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ मतदारांसाठी ही एक संधी असली तरीही ज्यांना शक्य आहे अशा ज्येष्ठ नागरिकांनी  प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि इतरांना आदर्श घालून द्यावा असे आवाहन देशपांडे त्यांनी केले.