मंडलिक, मानेंकडून प्रचार सुरू…

पुढील महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होणार असून यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांबाबत गेले महिनाभर चर्चा सुरू आहे. मंडलिक आणि माने यांनाच उमेदवारी मिळणार की यातील एका जागेवर भाजप दावा करणार इथंपासून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज निश्चित असल्यापासून हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी स्वतंत्र लढवणार इथपर्यंतच्या बातम्यांची वातावरण ढवळून गेले आहे.

उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मंडलिक यांनी पन्हाळा तालुक्यातील करवीर विधानसभा मतदारसंघातील गावांपासून प्रचार सुरू केला असून माने यांनी तर हातकणंगले, शिरोळसह सांगली जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये विकासकामांचे उद्घाटन अंतिम टप्प्यात आणली आहेत.

धैर्यशील माने यांनी गावोगावी विकासकामांच्या उद्घाटनांना सुरुवात केली असून सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा तालुक्याचाही दौरा सुरू केला असून शिरोळ, हातकणंगलेतील विविध गावातील विकासकामांचे उद्घाटन केले आहे. माने यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कोणत्या गावात किती कामे मंजूर केली त्याची यादीच दिली होती. त्यानुसार आता हे उद्घाटन सुरू करण्यात आले आहेत.