आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात पाच वर्षात सूत जुळले नाही. त्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर तरी खासदार धैर्यशील माने यांच्यासोबत आवाडे यांचे जुळेल, असे वाटत होते.परंतु निवडणुकीनंतरच्या काही घडामोडींतून अद्याप तरी त्यांचे जुळले नसल्याचेच चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर विधानसभेलाही वेगळी रंगत येण्याची शक्यता निर्माण होताना दिसत आहे.एकमेकांविरोधात विधानसभा निवडणूक लढविलेले आवाडे-हाळवणकर यांच्यात मनोमिलन होईल, यासाठी काही प्रयत्न झाले. परंतु त्यात यश आले नाही. एकमेकांविरूद्ध कुरघोड्यांच्या राजकारणासह टीकाटिप्पणी सुरूच राहिली.
त्यात खासदार माने यांच्या दुर्लक्षपणाच्या भूमिकेमुळे दोघेही त्यांच्यापासून लांब गेले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीकडून माने यांनाच उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या हाळवणकर यांच्यासह आमदार आवाडे यांनाही त्यांचा प्रचार करावा लागला.आवाडे यांना विविध विकासकामांत अडथळे आणत असल्याच्या कारणावरून आवाडे हे माने यांच्यावर प्रचंड नाराज होते.
जाहीर सभेत त्यांनी उमेदवार बदलाची भाषा केली होती. तसेच अदृशशक्ती महापालिकेमार्फत विकासकामांना अडथळे आणत असल्याचे पत्रकार बैठक घेऊन सांगितले होते. त्यातूनही काही होत नाही म्हटल्यावर आपली ताकद दाखवून देण्यासाठी लोकसभेला उमेदवारीचे हत्यार उपसले होते.
आवाडे यांच्या भूमिकेमुळे माने यांना अडचण होईल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाडे यांची मनधरणी करत उमेदवारी मागे घेऊन माने यांनाच पाठिंबा देण्यासाठी तयार केले. यासंदर्भात झालेल्या दोन बैठकीत आवाडे यांनी पाच वर्षात माने यांच्यामुळे झालेल्या अडथळ्यांचा पाढाच वाचला होता. त्यावर निश्चित मार्ग काढला जाईल, अशीही चर्चा बैठकीत झाल्याचे समजले होते.
परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसत आहे. निवडणुकीनंतर आयुक्तांच्या बदलीचा खेळखंडोबा झाला. त्यात दोन्हीकडील राजकारण दिसले. त्यानंतर झालेल्या आवाडे यांच्या पत्रकार बैठकीतही लोकसभा निवडणुकीनंतर अदृशशक्तीचा त्रास कमी झाला का, असा प्रश्न पत्रकारांनी केला.
त्यावर आवाडे यांनी, अदृशशक्तीची राजकीय शक्ती कार्यरत झाली आहे, असे तांत्रिक उत्तर दिले. या घडामोडींवरून दोघांचे जुळले नसल्याचे चित्र दिसत आहे.याचा आगामी विधानसभा निवडणुकीवरही रंगतदार परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार आवाडे यांचे चांगलेच जुळले आहे. परंतु स्थानिक पातळीवर दोघांच्याही प्रतिनिधींसोबत सूत जुळत नसल्याने अडचणींचा अडथळा आवाडे यांना वारंवार पार करावा लागतो.