महसूलच्या पथकावर वाळू माफियांची दगडफेक

गुरसाळे ( ता. पंढरपूर) येथे अवैध वाळू उपस्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी तलवारी, कोयते घेऊन दगड फेक केल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

गुरसाळे ( ता. पंढरपूर) येथील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती प्रांत अधिकारी सचिन ईतापे व तहसीलदार सचिन लंगोटे यांना मिळाली त्यांनी तत्काळ खर्डीचे मंडळ अधिकारी दिलीप सरवदे, बोहाळी तलाठी विष्णू व्यवहारे, सोनके तलाठी अमर पाटील, तावशीचे कोतवाल सुधाकर हिल्लाळ, खर्डीचे कोतवाल सुधाकर चंदनशिवे हे महसूल पथक गुरसाळे ( ता. पंढरपूर) येथे कारवाईसाठी पाठवले.

हे पथक रविवारी पाच वाजता नदी पात्रात पोहचले. यावेळी चार टीपर, एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर, होते. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वाळू माफियांनी त्यांनी कर्मचाऱ्यांना मदत करतो असे सांगून ते तेथून गेले अन् काही वेळाने ३० ते ४० लोकांसह हत्यारे घेऊन आले.

त्याचबरोबर महसूलच्या पथकावर दगड फेक सुरू केली. व तीन टीपर, एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले. एक वाहन चालू झाले नाही वाळू चोर तेथे सोडून गेले. यानंतर पथकाने एक टीपर जप्त केला आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.