खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांना आता गणवेश (ड्रेसकोड) बंधनकारक असणार आहे. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांना तीन गणवेशाचे पर्याय दिले असून, ३१ जुलैपर्यंत त्यांनी गणवेश शिलाई करून घ्यायचे आहेत.अन्यथा, त्यांना ५०० ते १५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व स्वयंशिस्तीसाठी रिक्षा चालकास गणवेश बंधनकारक आहे. आरटीओ कार्यालयाने रिक्षा चालकांना ‘खाकी’चा पर्याय दिला आहे, पण वाहतूक पोलिसांनी तीन गणवेशांपैकी एकाचा वापर करण्याचा पर्याय दिला आहे. आता ३१ जुलैपर्यंत किती रिक्षाचालक पोलिसांचे आदेश पाळतात, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
गणवेशाचे तीन पर्याय
१) पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट
२) खाकी पॅन्ट, खाकी पॅन्ट
३) खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी गणवेशाचे बंधन आहे. सोलापूर शहरातील रस्त्यांवरून दररोज १५ हजारांहून अधिक ॲटोरिक्षा धावतात, पण त्यातील ६० ते ७० टक्के चालक गणवेशाविनाच असतात.
अशा रिक्षा चालकांसाठी शहर वाहतूक पोलिसांनी ३१ जुलैपर्यंत डेडलाईन दिली आहे. त्यानंतर पहिल्यांदा कारवाई करताना संबंधित रिक्षाचालकास ५०० रुपयांचा दंड भरावा लागेल. एकदा दंड होऊनही त्याने ड्रेसकोडचे पालन न केल्यास पुन्हा प्रत्येक वेळी दीड हजार रुपयांचा दंड होणार आहे. त्यामुळे आता रिक्षाचालकांना गणवेश शिलाई करून घ्यावाच लागणार आहे.
