राज्य शासनाच्या गायदूध अनुदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी व मल्टिस्टेट दूध संघाकडून ९१ हजार ६०१ दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती भरण्यात आली आहे.पण, निकषानुसार केवळ ‘गोकूळ’ दूध संघाच्या ८१ हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली आहे, त्यातील ७ हजार खात्यांची पडताळणी पूर्ण झाली असून, आगामी चार दिवसांत उर्वरित खात्यांची पडताळणी होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठी दुग्ध विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.राज्य शासनाने गाय दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
हे अनुदान ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या एक महिन्यासाठीच दिले जाणार होते त्यासाठी शासनाने ढीगभर अटी घातल्या होत्या. दहा दिवसांच्या दुधाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे, पशुधन टॅगिंग, आदी अटी होत्या. त्यानुसार दहा दिवसांची माहिती दूध संस्थांना भरण्यास सांगितले होते.
जिल्ह्यात सहकारी व खासगी दूध संघाकडील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या समारे ११ हजार ६०१ आहे. त्यापैकी एकट्या ‘गोकुळ’कडे ८१ हजार शेतकरी आहेत. आतापर्यंत ‘गोकूळ’च्या ७ हजार खातेदारांच्या माहितीची पडताळणी झाली असून, येत्या चार दिवसात उर्वरित खातेदारांची माहितीची पडताळणी होऊन पैसे खात्यावर वर्ग होणार आहेत.