गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. वातावरणातील या बदलामुळे मंगळवारी सकाळी कोल्हापूर धुक्यात हरवल्याचे दिसले. दरम्यान, सकाळच्या थंडीमुळे लोक गारठून गेले आहेत.शहरातील नागरिक शेकोटी करून दाट धुक्याचा आनंद लुटत आहेत.या धुक्यातून वाहन चालवताना समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने चालकांना कसरत देखील करावी लागत आहे.
सध्या महाराष्ट्रतील काही शहरांमध्ये कड्याक्याची थंडी पडली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील काही शहरांचा पारा घसरलेला आहे. कोल्हापुरात आज मंगळवारी १४° डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. यामुळे कोल्हापूर शहरात थंड गारवा जाणवत आहे.नागरिक शहरात जागो जागी रात्री आणि पहाटेच्या वेळीही शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत. दुपारीही थंड वारा सुटत असल्याने नागरिक स्वेटर, कानटोपी, जॅकेट घालून घराबाहेर पडत असल्याचे दिसते तसेच शहरातील शिवाजी विद्यापीठ, रंकाळा, सर्किट हाऊस सारख्या अनेक भागात मॉर्निंग वॉक ला जाणारे लोक आता थंड धुक्यात चहाच्या टपरीवर चहा, कॉफी चा आस्वाद घेत असताना दिसत आहेत. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग देखील धुक्यात हरवून गेल्याने महामार्गावरून जाणाऱ्या चालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने सावधगिरी बाळगत हेडलाईटचा आधार घेत वाहन हळू चालवावे लागत आहे.