सोलापूरच्या किरण नवगिरेची मुंबईविरुद्ध वादळी खेळी!

 वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धाच्या सहाव्या सामन्यात तसं पाहिलं तर मुंबई इंडियन्सच पारड जड होतं . युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. मुंबईने अपेक्षेप्रमाणे 6 गडी गमवून 161 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यामुळे युपी वॉरियर्सला विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. एलिसा हिलीसोबत ओपनिंगला लेडी धोनी नावाने ओळखली जाणारी किरण नवगिरे उतरली.

पहिल्या षटकात ती पुढे काय करेल याचा कुणालाच अंदाज नव्हता. मात्र दुसऱ्या षटकात स्ट्राईक मिळताच आक्रमक सुरुवात केली. बघता बघता चेंडू आणि धावांमधील अंतर कमी केलं. किरण नवगिरेने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यात 48 धावा तिने चौकार आणि षटकाराच्या मदतीने केल्या. तिने 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले. किरण नवगिरेला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. सामन्यानंतर तिने आपलं मन मोकळं केलं.

“मागच्या सामन्यात जास्त दुखापत झाली नाही, मी आता ठीक आहे. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की कदाचित तुला ओपनिंग करावं लागेल. म्हणून मी मानसिक तयारी केली होती. जेव्हा स्कोर मोठा होता तेव्हा मुख्य प्रशिक्षक मला म्हणाले की तू सलामीला उतरशील. त्यामुळे मला आनंद झाला. मी गुणवत्तेवर चेंडू खेळत होते आणि हीच योजना होती. मला माझ्या ताकदीनुसार खेळायला आवडते आणि मी तेच करते.”, असं किरण नवगिरे हीने सामन्यानंतर सांगितलं.

वुमन्स लीगच्या पहिल्या दोन सामन्यात किरण नवगिरेल सहाव्या स्थानावर उतरली होती. यावेळी तिला काही खास कामगिरी करता आली नाही. किरणने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध अवघी 1 धाव केली होती. तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सहाव्या क्रमांकावर उतरून 7 चेंडूत 10 धावा केल्या होत्या. युपी वॉरियर्सचा स्पर्धेतील चौथा सामना गुजरात जायंट्ससोबत 1 मार्च रोजी आहे.