भारतीय चाहते ज्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते, ती रविवारी BCCI ने केली. रोहित शर्मा व विराट कोहली या अनुभवी खेळाडूंची १४ महिन्यानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघात एन्ट्री झाली.
अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने १६ सदस्यीय संघ रविवारी जाहीर केला. या संघातून रोहित, विराट यांच्यासह संजू सॅमसनही पुनरागमन करणार आहे. पण, त्याचवेळी यष्टिरक्षक-फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) याचे नाव संघात नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही कर्नाटकच्या फलंदाजाला संधी का मिळाली नाही, असा प्रश्न चाहत्यांना सतावतोय
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान लोकेश राहुलने दमदारम कामगिरी करून दाखवली, त्याने सेंच्युरियन कसोटीत शतक झळकावले, तरीही अजित आगरकर प्रमुख असलेल्या निवड समितीने त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी नाही निवडले.
३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी निवड समिती अन्य पर्यायांची चाचपणी करू इच्छित होते. सलामीला आणि मधल्या फळीत त्यांना प्रयोग करायचे आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत राहुल सलामीवीर म्हणून खेळला आहे. शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल हेही चांगल्या फॉर्मात आहेत आणि सलामीसाठी सक्षम उमेदवार आहेत. कोहली आणि रोहित हेही संघात परतले आहेत, त्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत राहुलसाठी जागा उपलब्ध नाही.
यष्टिरक्षकाचा विचार केल्यास निवड समितीने जितेश शर्मा व संजू सॅमसन यांना संधी दिली आहे आणि त्यांच्यावर मॅच फिनिशर फलंदाजाचीही जबाबदारी असेल. राहुलने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ही भूमिका कधीच पार पाडलेली नाही. आयपीएलमध्येही त्याला फिनिशरची भूमिकेसाठी दावा सांगता येऊ शकतो. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याच्या निर्धाराने तो लखनौ सुपर जायंट्सकडून फिनिशर म्हणून खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटता कामा नये.