भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल गेले काही दिवस डेंग्यूच्या तापाने त्रस्त आहे आणि त्याच्या प्लेटलेट्सची संख्या एक लाखांपेक्षा कमी झाल्यामुळे त्याला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता आनंदाची बातमी ही आली आहे की त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे, परंतु अहमदाबादमध्ये १४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणे अजूनही साशंक आहे. गिल याच्या प्लेटलेटची संख्या कमी झाल्याने त्याला रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना तो खेळू शकला नाही. गेल्या आठवड्यात चेन्नईत आल्यानंतर गिलला डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले.
तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळू शकला नाही आणि बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा दुसरा सामना खेळू शकणार नाही, हे बीसीसीआयद्वारा स्पष्ट करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘चेन्नईतील टीम हॉटेलमध्ये शुभमनला ड्रिप देण्यात येत होती, परंतु त्याचे प्लेटलेट्स ७०,००० पर्यंत खाली आले. प्लेटलेटची संख्या एक लाखाच्या खाली गेल्यावर रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. रविवारी रात्री त्याच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आणि सोमवारी संध्याकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
डेंग्यूमुळे शरीर कमकुवत होते आणि त्यातून बरे होण्यास वेळ लागतो. सामान्य माणसासाठी प्लेटलेट्स १.५ ते ४.५ लाखांच्या दरम्यान असावेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही गिल लवकर बरा व्हावा याला आपले प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो म्हणाला होता, ‘मला त्याच्याबद्दल वाईट वाटत आहे. शुभमन गिलने लवकर बरा व्हावे अशी माझी इच्छा आहे. इथल्या कर्णधाराप्रमाणे मला गिलने उद्या खेळावे असे वाटत नाही.तो युवा आहे आणि आशा आहे की तो लवकरच बरा होईल. निवड समिती त्याच्यासाठी बदली खेळाडू बोलावण्याची शक्यता आहे. पहिला पर्याय असेल ऋतुराज गायकवाड, ज्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलामीवीर म्हणून निवड झाली आणि मोहालीत त्याने अर्धशतक झळकावले.