मुंबई इंडियन्सने बुधवारी दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. या मोठ्या विजयानंतर टीम मालकीण नीता अंबानींचा सेलिब्रेशनचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याचं सेलिब्रेशन चर्चेत आलं आहे. नीता अंबानी यांचा 6 बोटं दाखवत जणू सहाव्यांदा मुंबई इंडियन्स ट्रॉफी जिंकणार आहे असाच काहीसा इशारा दिला आहे.
नीता अंबानींचा सेलिब्रेशनचा अंदाज चर्चेत
सामना जिंकल्यानंतर कॅमेरा थेट नीता अंबानींवर गेला, ज्या स्टँडमध्ये आकाश अंबानीसोबत बसलेल्या होत्या. त्यांनी हवेत 6 बोटं दाखवत दमदार सेलिब्रेशन केलं, ज्याचा अर्थ स्पष्ट होता – ‘सावधान, सहावी ट्रॉफी आमचीच असेल!’
इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर मुंबई
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्याकडे सध्या 5-5 ट्रॉफी आहेत. यंदा जर मुंबई इंडियन्सचा विजय झाला, तर ती एकटीच सर्वाधिक वेळा IPL जिंकणारी टीम बनेल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने पुन्हा एकदा स्वतःचा दबदबा दाखवून दिला आहे.
वानखेडेवर मुंबईचा जलवा
वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मुंबई विरुद्ध दिल्ली या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासह मुंबईने 180 धावा केल्या. सुरुवातीचे तीन विकेट पाठोपाठ गेल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचे काम केले. सूर्यकुमारने 43 चेंडूंमध्ये नाबाद 73 धावांची खेळी केली, ज्यात 4 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.
मात्र दिल्ली कॅपिटल्सचा पाठलाग करण्याचा प्लॅन सपशेल फसला. दिल्लीची संपूर्ण टीम केवळ 121 धावांत गुंडाळली गेली. सॅनटनर आणि जसप्रीत बुमराह यांनी 3-3 विकेट घेत टीमला मजबूत विजय मिळवून दिला.