लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर राज्यातील राजकीय प्रचार संपलेला आहे. आता सर्वच उमेदवारांना ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे.या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार अशी चर्चा आहे. त्यातच निवडणुकीनंतर इथल्या काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केले होते मात्र या स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी लावलेल्या हजेरीनं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्नेहभोजनास विशाल पाटलांच्या हजेरीनं ठाकरे गटही संतापला आहे. त्यामुळे आयोजक आणि विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसनं कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे.दरम्यान, सांगलीत काँग्रेस कधीच उबाठा गटासोबत नव्हती. उबाठाशी त्यांचा संबंध नव्हता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचे काम केले. हे सर्व सांगलीकरांना माहिती आहे. त्यामुळे उबाठा गटानं काय मागणी केली त्याकडे काँग्रेस लक्ष देणार नाही. स्नेहभोजनासाठी एकत्रित आलेल्या सर्वांनी ठरवूनच विशाल पाटलांचे काम केले होते. काँग्रेस उबाठासोबत नव्हतीच असा टोला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी लगावला आहे.