महायुतीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धक्कादायक निकालांची नोंद करत सांगली जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली. आठपैकी पाच जागा महायुतीने तर तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या.सर्वाधिक चार जागा जिंकत भाजप हा सांगली जिल्ह्याचा नवा बाहुबली ठरला. त्यामुळे सांगली, मिरजेसह विजयी मतदारसंघात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
सांगली, मिरज, जत व शिराळा या चार मतदारसंघांवर भाजपने विजयी झेंडा फडकवला. शिंदेसेनेने सुहास बाबर यांच्या माध्यमातून खानापूरची जागा राखण्यात यश मिळविले. मात्र, उद्धवसेनेला जिल्ह्यात खाते उघडता आले नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसला मागील निवडणुकीच्या तुलनेत प्रत्येकी एका जागेचे नुकसान झाले.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ या दोन तर काँग्रेसला पलूस-कडेगाव या एकाच जागेवर विजय मिळविता आला. मात्र, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या मताधिक्यात मोठी घट नोंदविली गेली. त्यामुळे घटलेल्या मताधिक्याचा धक्काही त्यांना बसला.जिल्ह्यात सर्वाधिक ७७ हजार ५२२ इतके मताधिक्य शिंदेसेनेचे सुहास बाबर यांना मिळाले, तर सर्वात कमी म्हणजे ११ हजार ९११ इतके मताधिक्य जयंत पाटील यांना मिळाले. आजवरच्या आठ निवडणुकांतील त्यांचे हे सर्वात कमी मताधिक्य नोंदले गेले.