1 जूननंतर टॅगिंगशिवाय खरेदी-विक्री राहणार….

भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ‘कानावर शिक्के’ असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री, उपचार केले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे.केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन (NDIM) अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत.

त्यामुळे जनावरांची जन्म-मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक औषधोपचार, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, खरेदी-विक्रीची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.

या माहितीच्या आधारे शेतकरी, पशुपालकांना शासनाच्या सुविधा, योजना, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय, या नोंदणीमुळे जनावरांमधील होणाऱ्या विविध आजारांची आगाऊ माहिती मिळाल्याने अन्य परिसरात प्रतिबंधात्मक उपाय राबवून पशुधनाची जीवित हानी टाळता येणार आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचा ईअर टॅग काढू नये अथवा तोडू नये. जनावराचा टॅग पडला असेल किंवा जनावरांची नवीन खरेदी केली असेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याची नोंदणी करून घ्यावी. भविष्यामध्ये येणाऱ्या पशुधनाच्या योजना यांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.