सांगली लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे काँग्रेस भक्कमपणे उभी राहिली आहे. अपवाद वगळता सातत्याने काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामुळे ती जागा काँग्रेसच लढणार आहे. अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेनेने विदर्भातील जागांच्या पर्यायावर चर्चा करावी. सांगली मतदारसंघ आम्ही सोडू शकत नाही, अशी भूमिका जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. प्रदेश काँग्रेसची मंगळवारी पाच तारखेला मुंबईत टिळक भवनला बैठक होत आहे.
त्यामध्ये विश्वजीत कदम यांच्यासह नेते बाजू मांडणार आहेत.प्रदेश काँग्रेसची मंगळवारी मुंबईत टिळक भवनला बैठक होत आहे. त्यात राज्यातील गडचिरोली, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, रामटेक, नागपूर, अमरावती, अकोला, लातूर, जालना, धुळे, नंदूरबार, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे आणि भिवंडी या मतदारसंघांवर चर्चा होणार आहे.
काँग्रेस (Congress) ने या निवडणुकीत सांगलीच्या जागेबाबत तडजोड करायची नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामागे 2019 ची पुनरावृत्ती होऊन वसंतदादा घराण्यावर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे.