सोलापुरात जरांगे पाटलांचा मोठा खुलासा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांची वैरागमध्ये सभा सुरू आहे, या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात आला आहे, मराठा आरक्षणाचा लढा आता आपण जिंकला आहे.

63 लाख कुणबी दाखले सापडले आहेत. त्यातून सव्वा कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे, आता सगे-सोयऱ्याच्या अंमलबजावणीनंतर सर्व मराठी बांधवांना आरक्षण मिळेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी दहा फेब्रुवारीलाच उपोषण सुरू का केलं याचं उत्तर आज इथे वैरागमध्ये देतो. उपोषण सुरू केल्यामुळेच विधानसभेच्या पटलावर आरक्षणाच्या हालचालींना गती मिळाली. त्यामुळेच आधी राज्य सरकारला कायदा करावा लागला.

अधिसूचना स्विकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सांगितले होते, गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, मात्र आता त्यांनी नवा डाव टाकल्याचा हल्लाबोल यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे.दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस अजूनही आत्याच्याच भूमिकेत आहेत. तुमचे निवडणुकीचे बोर्ड लागणार आहेत, त्यावेळी आम्हीही पोलिसांना फोन करणार आहोत, बोर्ड काढायला सांगणार आहोत.

ही मोहिम सर्व राज्यात राबवली गेली पाहिजे, राजकारण्यांनी मत मागण्यासाठी आमच्या दारात येऊ नये, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.दरम्यान माझ्यावर एसआयटी लावत आहेत, पण मी एसआयटीला घाबरत नाही. पळून जाणारी ही अवलाद नाही. मी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय सुट्टी देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.