सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येणार असून सीना नदीकाठ परिसरातील गावांमधून मोटारी लावून पाणी उपसा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, सीना नदीकाठ परिसरातील सव्वाशेहून अधिक गावांमध्ये केवळ तीन तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
यासोबत काही गावांमध्ये चोवीस तास वीजपुरवठा खंडित करण्याचे नियोजन असून नियमानुसार तसेच सर्व विभागाच्या नियोजनातून वीज खंडित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.उजनीचे पाणी २१ कोल्हापूर टाईप बंधाऱ्यातून सोलापूरला पाणी येणार आहे. या दरम्यान सव्वाशेहून अधिक गावे लागतात. नदीतून तसेच इतर बंधाऱ्यातून शेतकरी शेतीसाठी पाणी उपसा करतात. प्रत्यक्षात यास कुठलीही परवानगी नसते.
हा बेकायदा उपसा असून शेतकऱ्यांना यापूर्वी अनेकदा समज दिली आहे. परंतु नदीकाठ परिसरातील शेतकरी उजनीचे पाणी चोरतात. यामुळे, सोलापूरला कमी पाणी मिळते. यासाठी प्रशासन वीजपुरवठा खंडित करून बेकायदा पाणी उपसा रोखणार आहे.तसेच मोटार लावून पाणी उपसा होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मोटारी जप्त करून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी या गावांमध्ये केवळ आठ तास वीजपुरवठा होत होता. आता यात कपात करण्यात आली असून बेकायदा पाणी उपसा सुरू राहिल्यास संपूर्ण चोवीस तास वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.