सोलापुरात पाण्याची तीव्र पाणी टंचाई जाणवते. पावसाअभावी येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.उजनीतील उणे ३७ टक्क्यांवर असून पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईवर उपाय म्हणून उजनी जलाशय परिसरातील वीजपुरवठा सहा तास, नदी काठावरील वीजपुरवठा चार तास आणि नद्यांवरील बंधारा परिसरात दोन तास वीजपुरवठा केला जातो आहे. जेणेकरून संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता कमी होईल.
दरम्यान, आता उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडता येणार नाही. पाणी पातळी खोलवर गेल्याने कॅनॉल, उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याचा पर्याय खुंटला आहे. पावसाळ्याशिवाय शेतीसाठी पाणीच नाही, अशी सद्य:स्थिती आहे. तीव्र उन्हामुळे होणारे बाष्पिभवन, ४७ योजनांचा पाणीपुरवठा, यामुळे आठ ते दहा दिवसाला एक टीएमसी पाणी संपत
आहे. सध्या धरणातील मृतसाठा ४४.२२ टीएमसीपर्यंत असून त्यात सहा टीएमसीपर्यंत गाळ आहे.
त्यामुळे ३८ टीएमसी पाण्यातील काही पाणी राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्बंधामुळे उपसा करता येत नाही. दुसरीकडे धरण उणे ६५ टक्क्यांवर गेल्यास धरणावर अवलंबून बहुतेक योजना बंद पडतात. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची काटकसर आतापासूनच करावी लागणार आहे. पावसाळा अजून किमान अडीच महिने दूर आहे.