सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून याठिकाणी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने आम्ही निवडणुकीची जय्यत तयारी केलेली असून काँग्रेससह मित्रपक्ष एकदिलाने व पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार आहे.
येथील उमेदवारीबाबत पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय देतील, त्यानुसार आम्ही काम करू, असे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) नियमित बैठकीसाठी ते रविवारी (दि.१०) येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सांगली लोकसभेची जागा मागील दोन पंचवार्षिकला काही अडचणीमुळे आमच्या हातून गेली. मात्र, आता ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष एकदिलाने या जागेसाठी लढणार आहेत. मी स्वतः मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत आहे. यंदाची लोकसभा पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, सांगली येथे काँग्रेस नेते सचिन पायलट यांची आज (दि.१०) सभा आहे. त्यामुळे विशाल पाटील हे बैठकीस उपस्थित राहून तातडीने सांगलीकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.