सांगोल्यात अटीतटीच्या व चुरशीच्या लढाईत कोण मारणार बाजी ? लागली उत्सुकता……

सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी ३ लाख ३३ हजार ४९३ मतदार होते. यापैकी २ लाख ६० हजार ५८९ मतदारांनी मतदान केले. सांगोला तालुक्यात रात्री साडेदहापर्यंत सरासरी ७८.१४ टक्के मतदान झाले. सांगोला मतदार संघासाठी १ लाख ७२ हजार ७०४ पुरुष, १ लाख ६० हजार ७८४ महिला असे एकूण तीन लाख ३३ हजार ४९३ मतदार आहेत यापैकी रात्री साडेदहा वाजेपर्यंत १ लाख ३६ हजार २३६ पुरुष व १ लाख २४ हजार ३५२ महिला इतर एक असे 2 लाख ६० हजार ५८९ मतदारांनी मतदान केले. तालुक्यात सरासरी ७८.१४ टक्के मतदान झाले. सांगोला विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत दुरंगी लढतीचा सामना पाहेलेला होता.

यंदा मात्र तिरंगी सामना पाहायला मिळणार असून तिन्हीही तुल्यबळ उमेदवार हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे सांगोल्याच्या या तिरंगी लढतीच्या लढतीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये एकीकडे दोन वेळा आमदार झालेले महायुतीमधील मुख्यमंत्री शिंदे गटाचे उमेदवार शहाजीबापू पाटील तर दुसरीकडे विधानपरिषदेवर निवडून गेलेले माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील तर तिसरे जरी नवखे असले तरी या मतदारसंघातून तब्बल 11 वेळा निवडून गेलेले तत्कालीन आमदार स्व. गगणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख असे तिघेही मातब्बर, तुल्यबळ, वजनदार उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत.

या अटीतटीच्या व चुरशीच्या लढाईमध्ये कोण जिंकणार?आणि कोण हरणार? हे पाहण्याची उत्कंठा सर्वपक्षीय नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार या सर्वांनाच लागून राहिलेली आहे. शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला कोण बाजी मारणार? हे स्पष्ट होईलच.