गणेशोत्सवात शंभर रुपयांत आनंदाचा शिधा!

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी-गणपती सणासाठी शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येत आहे.यामध्ये हरभरा डाळ, रवा, साखर, खाद्यतेल प्रत्येकी एक किलोचा समावेश आहे. याचे वितरण 6 सप्टेंबरपासून करण्यात येणार असून, याचा जिल्ह्यातील चार लाख कुटुंबांना लाभ मिळणार आहे.

एकूण लाभार्थींच्या तुलनेत 92 टक्केच कीट येत असल्यामुळे याबाबत रेशन दुकानदार संघटनेने प्रशासनाकडे तक्रार केली आहे.गौरी-गणपतीच्या सणासाठी शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी 3 लाख 96 हजार 290 इतके आनंदाचा शिधा संच मंजूर करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे पुरवठादार कंपनीकडून त्या त्या तालुक्याच्या गोदामामध्ये ते पाठवण्यात आले आहेत.

यामध्ये दुकानदारांना सहा रुपये कमिशन देण्यात येणार आहे.एकूण लाभार्थ्यांपैकी 92 टक्के लाभार्थीनाच शिधा येत असल्यामुळे ग्राहकांना याचे वितरण करताना समस्या निर्माण होत असल्याची तक्रार रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

तालुकानिहाय लाभार्थींची संख्या…

सांगली : 52079, मिरज : 44983, कवठेमहांकाळ : 23088, जत : 49946, आटपाडी : 22391, कडेगाव : 24747, खानापूर-विटा : 26831, तासगाव : 40130, पलूस : 26860, वाळवा : 59961, शिराळा : 25294, एकूण 3,96,290.