शेट्टी आघाडीत नाही आले तर……

लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक जण व्यस्त झालेला पाहायला मिळत आहे. आपापली मोर्चे बांधणी जोरदार सुरू देखील केलेली आहे. तसेच अनेक नेते मंडळींची नावे देखील पुढे सरसावत आहेत. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा जागांचा पेच अद्याप न सुटल्याने तर्कवितर्कांचे धुमारे दोन्ही मतदारसंघात फुटू लागले आहेत.

यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू असली, तरी मतदारही काहीसा संभ्रमात दिसत आहे.हे जरी खरे असले तरी समोर ताकदवान मल्ल कसा आहे, त्याचा अंदाज घेऊनच महाविकास आघाडी व महायुतीकडून राजकीय पटावर प्यादी पुढे सरकवले जाणार आहेत.

हातकणंगलेतून आघाडीची राजू शेट्टी यांच्यावर भिस्त आहे. ते आघाडीत येण्यास फारसे उत्सुक नाहीत किंवा त्यांना उघडपणे यायचे नाही. शेट्टी विरुद्ध खासदार धैर्यशील माने अशी लढत झाली तर माने यांच्या समोरील अडचणी वाढू शकतात. त्यात महायुतीतील नेते माने यांना उघड विरोध करू लागल्याने येथे काय होणार आहे ? याचा अंदाज भाजपला आला आहे.

त्यातूनच पर्यायांची चाचपणी सुरु झाली आहे. यातूनच आमदार विनय काेरे, शौमिका महाडीक, राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असली, तरी खासदार माने सहजासहजी ही जागा हातून सोडणार नाहीत.राजू शेट्टी महाविकास आघाडीत आले नाहीतर शिवसेनेकडून अनपेक्षितपणे नाव पुढे आणले जाणार आहे.

मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली असून यातून मतदारसंघाच्या पश्चिमेकडील तालुक्यातील युवा नेत्याचे नाव ‘मातोश्री’वरून पुढे आले आहे.