रुकडी येथील महिलेस पेटवून दिल्याच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता

जागेच्या वादातून रुकडी येथील सुरेखा विजय कोळी हिला पेटवून तिचा खून केल्याच्या आरोपातून संशयित प्रतिभा धनंजय कोळी (वय ३३) व श्रीमती कमल बाळासो कोळी (वय ६८ दोघे रा. रुकडी) यांची संशयाच्या पलिकडे जाऊन सरकार पक्ष गुन्हा शाबित करू शकला नाही. या मुद्यावर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी निर्दोष मुक्तता केली.

मयत सुरेखा व संशयित आरोपी यांच्यात रुकडी येथील वडिलोपार्जित जागेवरून वाद होता. २२ डिसेंबर २०१७ रोजी हा वाद वाढला व त्यातूनच संशयित प्रतिभा हिने सुरेखा हिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि कमल हिने तिला पेटवून दिले. जखमी सुरेखाच्या मुलाने तिला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले असता २३ डिसेंबर व २४ डिसेंबर रोजी सुरेखा हिने अनुक्रमे पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण व नायब तहसीलदार सानप यांच्या समोर मृत्यूपूर्व जवाब दिला.सदर प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात होऊन सुनावणीदरम्यान ८ साक्षीदारांच्या नोंदवण्यात आल्या. बचाव पक्ष तर्फे मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन अहवाल मान्य करण्यात आला. तर बचाव पक्षातर्फे साक्षीदार संजय कोळी हिने जळीत आरोपींना भीती घालण्यासाठी स्वतःहून पेटवून घेतले, आरोपींनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. अशी साक्ष दिली.

उपचारासाठी दाखल केल्यापासून सुरेखा कोळी व्हेंटीलेटरवर होती अशा परिस्थितीत मृत्यूपूर्व जबाब कसा नोंदवला हे स्पष्ट होत नाही. तसेच सलीम शेख विरुध्द महाराष्ट्र सरकार या खटल्यात दिलेल्या निर्देशानुसार नेमके काय उपचार केले हे समोर येत नाहीत असा युक्तीवाद संशयितातर्फे अॅड मेहबूब बाणदार यांनी मांडला.