कागदपत्रांवर आता वडिलांआधी लागणार आईचं नाव…..

सरकारी दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नावनोंदणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी नावनोंदणीत आईचे नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, १ मे २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपातच करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अशीच नोंद सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्येही करावी लागणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा, असे आदेशात म्हटले आहे.